केंद्रातील तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता दोन महिने होऊन गेले आहेत. तरीही कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा पाहता सरकारने धास्ती घेतल्याचं सध्या चित्र आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण मिळाले होते.
ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. स्वामींनी ट्विट करून लाल किल्ल्यावर झालेल्या गडबडीमागे पीएमओच्या जवळच्या भाजप नेत्याचा हात असल्याचा संशय सोशल मीडियातील वृत्ताच्या आधारे व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.
सुब्रमण्यम स्वामी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे. सध्या एक चर्चा सुरू आहे. कदाचित ती खोटी असू शकते किंवा शत्रूंच्या आयडीवरूनही ही चर्चा सुरू असू शकते. पीएमओच्या जवळ असलेल्या एका भाजपच्या सदस्याने लाल किल्ल्यावर जाऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याचा तपास करून खुलासा व्हावा, असं स्वामींनी म्हटलं आहे.