भाजपच्या मीडिया सेलच्या प्रमुखाचे पवारांच्या आजारपणाबद्दल आक्षेपार्ह ट्विट; माफीसाठी दोन दिवसांची वेळ, नाहीतर…

559

भाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने अशाप्रकारची टीका-टिप्पणी केली असती तर आम्ही समजू शकलो असतो. मात्र भाजपाच्या माध्यमप्रमुखाने असे ट्विट करणे दुर्दैवी आहे आणि आम्हाला सहन होण्यासारखे नाही. नवीन कुमारच्या वक्तव्याबद्दल भाजपाने दोन दिवसांत माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा मोठ्या रोषास त्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.

नवीन कुमार यांच्या ट्विटनंतर भाजपाने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे प. बंगालच्या निवडणुकीमागे लागल्याने त्यांना वेळ मिळाला नाही.

पण राज्यातील नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तरी नवीन कुमारच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करायला हवा होता, अशी टीका ना. हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली.