संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भाजपच्या सरपंचाचा राजीनामा!

28

पुजा चव्हान आत्महत्या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री याप्रकरणात असल्याचे कळताच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून सातत्याने लावून धरण्यात आली होती. यानंतर संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला. परंतू राजीनामा स्विकारण्यावरुन शिवसेनेत दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. बंजारा समाजावर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे राज्यभरातून बंजारा समाज राठोड यांच्या समर्थनार्थ समोर येत आहे. अशातच भाजपच्या एका सरपंचाने राजीनामा देत संजय राठोड यांना समर्थन दिले आहे.

कमल चव्हान असे या सरपंचाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील काळवाटी तांडा या गावाचे ते भाजपचे सरपंच आहेत. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी सांगीतले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. कमल चव्हान यांच्या अचानक राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्याच्या समर्थनार्थ भाजपच्या सरपंचाचा राजीनामा यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजप पक्षातील नेते महाराष्ट्रतील अोबीसी आणि बंजारा समाजाचे नेतृत्व संपवण्याचे काम करत असल्याचे जाणवले आहे. बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठीचे हे कटकारस्थान असल्याचे, कमल चव्हान यांनी आपल्या राजीनाम्यात नमुद केले आहे. दरम्याम भाजपमधील अोबीसी नेतृत्वास संपवण्याचे कार्य होत आहे या चर्चेत मध्यंतरी वाढ झाली होती. यावरुनच एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे एका व्यासपीठावरसुद्धा आले होते. आता कमल चव्हान यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा या मुद्दा चर्चेत येणार आहे.

संजय राठोड यांचा बंजारा समाजावर प्रचंड प्रभाव आहे. बंजारा समाजासाठी त्यांनी भरीव कार्येसुद्धा केली आहेत. राज्यात विविधठिकाणी बंजारा समाज राठोड यांच्या समर्थनार्थ भूमिका घेउन त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारु नये अशी मागणी करण्यात येत आहे.