भाजपची गळती कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
आता भाजपच्या एका माजी आमदाराला राष्ट्रवादीत प्रवेश देण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचं पुण्यातून समजतंय. भाजपच्या या बड्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
या माजी आमदाराने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये जाऊन फायदा झाला नसल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदरील माजी आमदाराने मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, अजित पवारांनी या माजी आमदाराला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोपवला आहे.
दरम्यान, हा माजी आमदार कधी पक्षात प्रवेश करणार हे गुलदस्त्यात आहे. तसेच या माजी आमदाराचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने हा आमदार कोण? याबद्दल पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या माजी आमदाराने पक्षात प्रवेश केल्यास त्याचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल असं बोललं जात आहे.