मातोश्रीच्या अंगणात भाजपच कमळ रुजणार ? माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपात प्रवेश

62

शिवसेनेचे निष्ठावंत सैनिक स्वर्गीय माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, मंगलप्रताप लोढा, अतुल भातखळकर, नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून तृप्ती सावंत यांनी २०१९ मध्ये बंडखोरी करून निवडणूक लढवली होती. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज भरत युतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे तेथे काँग्रेसच्या उमेदवाराने निवडणूक जिंकली होती.

बाळा सावंत हे शिवसेनेचे आमदार होते. त्यांच्या मृत्यूमुळे पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी त्यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. मात्र, शिवसेनेनं त्यांना २०१९ ला उमेदवारी दिली नव्हती.