भाजप शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर एक नविन कार्यक्रम राज्यात राबविण्याच्या प्रयत्नांत आहे.
भाजपा प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्यावतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ फेबृवारीपासून या स्पर्धेस सुरुवात होऊन १९ फेबृवारीस या स्पर्धेचा शेवट करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात शिवजागर होणार असल्याचे सांगत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव ऊपाध्ये यांनी ही माहिती दिली आहे.
शिवजयंतीच्या दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
ही स्पर्धा राज्यातील ४० ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेत १५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील. वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा एकत्रच होतील, मात्र परीक्षण स्वतंत्रपणे होणार आहे . “शिवगान स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ओवी, आरती, पाळणा, पोवाडा, स्फुर्ती गीत यांचे सादरीकरण केले जाणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा विनाशुल्क असणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर तीन ऊत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येतील. प्रथम क्रमांकाला अंतिम स्पर्धेसाठी किल्ले अजिंक्य तारा सातारा येथे स्पर्धेत सहभागी होता येईल.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पर्धेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी केशव ऊपाध्ये यांच्यासोबत प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड . शैलेश गोजमगुंडे, अभिनेत्री गीतांजली ठाकरे, अभिनेते मकरंद पाध्ये, दिग्दर्शक सचित यादव आदी उपस्थित होते.