ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने राज्यावर पुन्हा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदरील संचारबंदीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘खबरदारी घेणं योग्य आहे. मात्र, लॉकडाऊन काढून नागरिकांना सूट दिल्यानंतर पुन्हा त्यांच्यावर सरसकट संचारबंदीची सक्ती लादणं चुकीचं आहे. नागरिक टाळेबंदीच्या नुकसानीतून सावरत असताना पुन्हा नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतल्याने त्यांची परिस्थिती अवघड होईल’ अशी प्रतिक्रिया देत दरेकरांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमधील शिवसेना भवनात भाजपातील शेकडो स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्तांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपच्या टीकांना जोरदार प्रतिउत्तर उत्तर दिलं आहे.
संजय राऊत बोलतांना म्हणाले, ‘भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत असतात. टीका करणाऱ्या भाजपच्या काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. भाजपमधील काही लोकांना पीएचडी तर काहींना डीलिट दिली पाहिजे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांचा रोख दरेकरांनी संचारबंदीवर केलेल्या टीकेकडे होता, पुढे ते म्हणाले, ‘त्यांना लोकं मारायची आहेत. मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, तुमचा जीव वाचावा म्हणून त्यांनी संचारबंदी लागू केली आहे.’