भाजपच्या ‘या’ नेत्याकडून तुकाराम मुंडेंवर कौतुकाचा वर्षाव

16

नितीन गडकरी हे शनिवारी नागपूर मनपाने आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात आयुक्त तुकाराम मुंढे आणि आमदारांनी चांगले काम केल्याची पोचपावती दिली. 

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला होता. यामध्ये भाजपचे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी आणि संदीप जोशी आघाडीवर होते. याच वादातून तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदलीही झाली होती. मात्र, आता नितीन गडकरी यांनीच तुकाराम मुंढे यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसचे नगरसेवक हरिश ग्वालवंशी यांनी संत तुकाराम यांच्या नावाला महापालिका आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कृतीमुळे कलंक लावू नये, असे विधान केले. नगरसेवकांच्या या अरेरावीमुळे तुकाराम मुंढे प्रचंड व्यथित झाले. त्यामुळे तुकाराम मुंढे रागाच्या भरात सभागृहातून निघून गेले होते.

भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलत होते. जर अशाच अविर्भावात भाजपचे नगरसेवक बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे मुंढे यांनी ठणकावले.

कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये सातत्याने खटके उडत असल्यामुळे जून महिन्यात त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र, त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती.