परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्ग काळात महत्त्वपूर्ण अशा रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या परभणीतील बसस्थानक परिसरातील हाके मेडीकल विरूध्द काल रात्री दहाच्या सुमारास महसूल आणि औषधी प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत दोघांविरूध्द नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील दुकानास सील ठोकण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने निरीक्षक बळीराम मरेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवामोंढा पोलिस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल झाला आहे. विजय हाके व रवी आधारे हे दोघे जण संगणमत करून रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन जीवनावश्यक वस्तू आहे, हे माहीत असतानाही त्यावरील छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करताना आढळले. शासनाने घालून दिलेल्या औषध किंमत नियमंत्रण आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मेडीकल चालक विजय हाके आणि रवि आधारे या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली. शहरातील बस स्थानकाजवळील मेडिकल लाईनमध्ये असलेल्या काही मेडिकलमध्ये कोरोनासाठी लागणार्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांनी सायंकाळी 7.30 वाजल्यापासून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी दबा धरून तेथील ग्राहकांवर पाळत ठेवत होते.
हाके मेडिकलचा चालक चार हजार 200 रुपयांचे इंजेक्शन सहा हजार रुपयांना विक्री करत असल्याचे आढळून आले. रेमडेसिव्हीर तुटवडा होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक मेडिकल दुकानदारांनी हे इंजेक्शन दाबून ठेवले असून, ओळखीच्या ग्राहकांना तसेच ज्यादा दर देणार्या ग्राहकांनाच विक्री करत असल्याने अनेक गोरगरीब रुग्ण या इंजेक्शनपासून वंचित राहू लागले.