Blog : कामगार आणि शेतकरी म्हणजे व्यवस्थेचे कंडोम झाले आहेत

90

अमित मरकड

कॉलेजला असताना कंत्राटी कामगारांवर एक डॉक्युमेंट्री बनवली होती. तिला ‘घाण्याचे बैलं’ असं नाव दिलं होतं. त्याअगोदर मी स्वतः एका फार्मा कंपनीत सहा महिने कंत्राटी कामगार म्हणून काम करून या क्षेत्रातलं भयानक वास्तव अनुभवलेलं होतं. त्यामुळेच तो विषय निवडला होता. आजचं कामगार विधेयक पाहून त्या डॉक्युमेंट्रीचं नाव ‘कंडोम’ ठेवायला हवं होतं असं वाटतंय.

एमआयडीसीमध्ये असलेल्या छोट्या-मोठ्या कंपन्यात हजारो-लाखो तरुण मिळेल ते काम करत असतात. त्यात दहावी-बारावी पास नापास, डीएड-बीएड, बीए-एमए, बीएस्सी असे सर्वच तरुण भयानक अंग मेहनतीचे काम करत असतात. सकाळी सातला ड्युटी असेल तर पहाटे पाचलाच गेटवर येऊन रांगेत बसावं लागतं. काम तर काय-काय करावं लागेल सांगता येत नाही. पण पर्याय नसतो. शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात नोकरी मिळत नसल्याने त्यांच्यावर अशी कामे करण्याची वेळ येते. शहरात नोकरी शोधायला येणाऱ्या तरुणांपेक्षा हा आकडा कित्येक पटींनी जास्त आहे. किमान तीन-चार वर्षे इमाने-इतबारे दिवसाचे बारा-बारा तास नको ते काम केल्यावर सरासरी एक टक्का मुलांना कंपनीत ट्रेनिंग स्टाफमध्ये घेतलं जातं आणि बाकीच्यांना हाकललं जातं. दोन वर्षे ट्रेनिंग झाल्यावर बायचान्स काही जण कंपनीत पर्मनंट होतात. त्यातल्या त्यात वशिलेबाजी बाजी मारते. पर्मनंट झाल्यावर आयुष्यभराची शाश्वती मिळते, पगार वाढतो आणि इतर कामगारांसाठीच्या आवश्यक सुविधा मिळतात.

आयुष्यात कष्टाला पर्याय नाही हे सामान्यांचं हक्काचं तत्वज्ञान. भविष्याची एखादी छोटीशी जरी सुखद शक्यता असेल तर शेतकरी आणि कामगार डोळे झाकून कष्ट करतात. आयुष्याचे महत्त्वाचे वर्ष वाया घालवून मालकांचे घसे भरतात. त्यातल्या कित्येकांसमोर दुसरा काही पर्यायच उपलब्ध नसतो म्हणून प्रामाणिकपणे लढत असतात.
त्यांना लोकशाही,भांडवलशाही, न्याय-अन्याय, सेल्फ रिस्पेक्ट- शोषण यातल्या कशाचंच काही देणं-घेणं नसतं.कामगार युनियनसोबत जवळीक करतानाही हजारदा विचार करावा लागतो. काम करताना डोक्यात फक्त एकच आशा असते की पर्मनंट झालं की प्रश्न मिटतील.

आज संसदेत मंजूर झालेल्या कामगार विधेयकाने कित्येकांची ती एकमेव आशाही धूसर झाली असेल. फेसबुकवर त्यांच्या लग्नाचे विनोद होत आहेत. पण तो खरंच खूप गंभीर प्रश्न आहे. इतक्या दिवस शेतकरी आणि कंत्राटी कामगाराला मुलगी देताना लोक विचार करत होते आता मुलगा पर्मनंट असला तरी विचार करतील.आपल्या देशात आर्थिक दरीसुद्धा इतकी मोठी आहे की अनेकांना कंत्राटी कामगार म्हणजे नेमकं कोण हेसुद्धा माहिती नाही तर त्यांचे प्रश्न खूप दूर आणि हेच क्युट लोक सरकारच्या प्रत्येक धोरणाचे समर्थन करताना दिसतात.

सरकारच्या नजरेत नेमकं भविष्य काय आहे ते कळायला मार्ग नाही. आज बेरोजगार मुलगा पर्मनंट कामगार बापाच्या जीवावर आयपीएल बघत होता. उद्या बाप-लेक सोबत बघू शकतील, खायला क्रिस्पी बातम्या आणि व्हाट्सअप फ्राईज खातीलकामगार आणि शेतकरी म्हणजे व्यवस्थेचे कंडोम झाले आहेत. वापरलं की फेकलं.

(टीप : सदरील लेखातील मते लेखकाची वैयक्तीक आहेत)