मुंबई: राज्यात विशेष करून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिका सुद्धा सज्ज झालेली आहे.
एकीकडे सर्वाधिक मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होतं असतानाही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.
मुंबईत आतापर्यंत १० लाख लोकांना लस देण्यात आली आहे आणि दिवसाला १ लाख लोकांना लस देण्याचं आमचं उद्दीष्ट आहे”, असं चहल म्हणाले. यासोबतच मुंबईत येत्या काळात एका दिवसाला १० हजार रुग्ण वाढले तरी त्यांची व्यवस्था केली जाईल, असा दावा चहल यांनी केला आहे.
तसेच १० फेब्रुवारी ते २४ मार्च दरम्यान ५६ हजार २२० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पण बुधवारी एका दिवसात ४० हजार ४०० कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी ५ हजार ४५८ जण पॉझिटीव्ह आले. यातही ८३ टक्के कोरोना रूग्ण लक्षण नसलेले आहेत. त्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीच कारण नाही. महापालिकेचं परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे असे आयुक्त चहल यांनी बोलून दाखविले आहे.