कोरोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन ठरला पहिला देश

15

ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिली असून पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन कडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. युरोप किंवा अमेरिकेकडून सर्वात अगोदर लस येण्याची शक्यता होती. परंतु कोरोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने कोरोनावरील लस तयार करण्यात यश आले असल्याची घोषणा केली होती.

फायझरची लस कोरोनावर ९५ टक्के प्रभावी असुन जर्मनीतील औषध निर्माण कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकनस्थित कंपनी फायझरने युरोपियन युनियनकडे लसीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे. जगात फायझरच्या लसीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. एकूण १७० स्वयंसेवकांवर लिसीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वांमध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे संगण्यात आले आहे.

सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याच ब्रिटन सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत.त्यासाठी खूप कमी तापमान लागते. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं याबाबतीत निवेदन जाहीर केलं आहे.