ओबीसी आरक्षणावर भविष्यात येणारे संकट लक्षात घेऊन ओबीसी बांधव वेळीच जागे झाले पाहिजेत असे समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आरक्षण बचावासाठी जिल्ह्यातील ओबीसी बांधव हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरल्याचे पहिला मिळत आहे. घोषणाबाजी करत मोर्चाला अकोल्यातील बस स्थानकापुढील स्वराज्य भवनातून सुरुवात झाली आहे.
जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले परिषद आणि अन्य ओबीसी संघटनांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘ओबीसी जनगणना झालीच पाहिजे’, ‘आरक्षणाच्या हक्क खातर ओबीसी उतरली रस्त्यावर, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ इत्यादी घोषणा आणि हातात फलक घेऊन हजारो ओबीसी महिला आणि पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणारे प्रा.तुकाराम बिडकर यांनी मोर्चेकरांना संबोधित केले. ओबीसी आरक्षण बचाव मोर्चात बारा बलुतेदार संघ,कुणबी विकास मंडळ, भावसार समाज, माळी युवा संघटन, कुंभार महासंघ, परीट महासंघ, कोळी संघटना, खोरीप, जय मल्हार महासंघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोजक्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसींच्या मागण्यांसंदर्भातील निवेदन देण्यात आले.यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.