निर्मला सीतारामन अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बजेट देशासाठी असावं, निवडणुकीसाठी नाही. अर्थसंकल्पाबाबत आणखी माहिती येऊ द्या, त्यानंतर मी सविस्तर बोलतो, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले
अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे. तसंच, केंद्र सरकारनं नाशिक मेट्रोचं मॉडेल स्वीकारलं ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारलं जाईल. हे विकासाचे आणि नवनिर्माणाच्या धोरणाचे यश आहे.
आर्थिक थापा मारणं बंद केलं पाहिजे, सामान्य जनतेला पोटाची भाषा कळते, तरुणांना रोजगाराची भाषा कळते, असे म्हणत संजय राऊत यांनी सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळाले? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22 या वर्षांचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कोरोना कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अर्थसंकल्प हा वेगळा होता. यावेळी कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला.
मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरंच गिफ्ट मिळालंय. महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.