नुकत्याच पार पडलेल्या मराठवाडा पदवीधर मतदासंघातील निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप पदवीधर निवडणुकीत उभे असलेले अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांनी केला आहे. सोबतच चौकशीसाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार दाखल केलीय. निवडणूक आयोगाकडे न्याय मिळाला नाही तर, उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सिद्धेश्वर मुंडे म्हणालेत.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापेक्षा 186 मतपत्रिका जास्त निघाल्या आणि बऱ्याच मतपत्रिका कोऱ्या असल्याचा सिद्धेश्वर मुंडे यांनी दावा केला आहे. सोबतच मतदान केंद्राध्यक्षाच्या सह्यांमध्येही तफावत आहे. असा गंभीर आरोप सिद्धेश्वर मुंडे यांनी केला आहे. सिद्धेश्वर मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सगळ्या मतपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली आहे.
आता या आरोपांवर निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेईल हे पाहणं औत्सक्याचं ठरेल. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे शिरीष बोराळकर यांचा तब्बल 57895 मतांनी पराभव केला आहे.