यंदा चैत्यभूमीवर प्रवेश नाही; महापरिनिर्वाण दिनानिमित्त थेट प्रक्षेपण करू : धनंजय मुंडे

1

जगावर सध्या कोरोनाच मोठं सावट आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी जमतात. पण, यंदा कोरोनामुळे चैत्यभूमीवर गर्दी करू नये असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. धनंजय मुंडे यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. आणि महापालिका व चैत्यभूमी सदस्यांशी चर्चा केली.

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण केलं जाईल. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनुयायांना प्रवेश दिला जाणार नाही. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील काही अनुयायी आले तर त्यांना चैत्यभूमीवर जाता येणार नाही. अशोकस्तंभाजवळ थांबून त्यांना दर्शन घ्यावं लागेल, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं. 6 डिसेंबरला चैत्यभूमीवरून महापरिनिर्वाण दिनाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यावेळी देशभरातील नागरिक घरी बसून चैत्यभूमीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे या चित्रिकरणाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याचे आदेशही सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आले आहेत