चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांचा आज देशभरात चक्काजाम

9

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी संघटनांनी आता चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. शनिवारी ६ फेब्रुवारीला आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनाची घोषणा केल्यानंतर हरियाणा पोलिसांनी बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे.सर्व जिल्हा पोलीस अधिक्षकांना कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची सूचना करण्यात आल्याचे हरियाणा पोलिसांनी सांगितले. स्थानिक शेतकरी नेत्यांशी चर्चा करून आंदोलन शांततेत पार पडेल याची खात्री करून घ्यावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.

मात्र, त्यात दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरी सहभागी हाेणार नसल्याने या राज्यांमध्ये आंदाेलन हाेणार नसल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. फक्त राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जाम करण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केले आहे.

दिल्लीच्या सीमेवर दाेन महिन्यांहून अधिक कालावधीपासून शेतकरी आंदाेलन सुरू आहे. त्यावर ताेडगा न निघाल्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदाेलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत देशव्यापी चक्का जाम आंदाेलन करण्यात येणार आहे. राकेश टिकैत यांनी सांगितले, जे शेतकरी दिल्लीला येऊ शकले नाहीत, त्यांनी आपापल्या ठिकाणी आंदाेलन करावे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच खासगी वाहनातून काेणी आजारी व्यक्ती जात असल्यास अशा वाहनांना राेखणार नसल्याचे टिकैत यांनी सांगितले आहे. चक्का जाम आंदाेलनाबाबत काेणतीही सूचना देण्यात आलेली नाही, असे पाेलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरयाणातील पाेलीस सतर्क आहेत.