भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पराभव सहन करण्याची शक्ती देखील ठेवायला हवी. दुर्दैवाने त्यांना वारंवार पराभवाचे चटके बसणार आहेत. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलायला हवं, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
छगन भुजबळ यांनी जास्त बोलू नये, अन्यथा महागात पडेल, अशी धमकीवजा टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. तसेच छगन भुजबळ तुरूंगात असताना त्यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचा पुतण्या समीर भुजबळ आपल्या बंगल्यावर तासनतास बसलेला असायचा, असा दावाही त्यांनी केला.
त्यावर आपला पुतण्या समीर भुजबळ याला दीड महिने आधी तुरूंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर माझ्यावर कारवाई झाली. मग तो चंद्रकांत पाटील यांच्याकडे कधी गेला असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी हा कोणता पुतण्या काढला हे मला माहीत नाही, असा टोला भुजबळ यांनी लगावला.
पाटील यांची भाषा ही अरेरावीची आहे. भाजप लोकशाहीची पायमल्ली करत ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा हातातील शस्त्र म्हणून वापरत आहे. पाटील यांच्या वक्तव्यामुळे न्यायपालिकाही त्यांच्या हाती आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्याचे भुजबळ म्हणाले. लोकांवर खोट्या केसेस टाकणे, त्यासाठी यंत्रणा वापरणे भाजपकडून सुरु आहे. मात्र यावर बोलण्यात अर्थ नाही. माझ्या नजरेत चंद्रकांत पाटील यांनी तेवढी किंमत नाही, अशी बोचरी टीका भुजबळ यांनी यावेळी केली.