न्यायालयाने दीड वर्षांसाठी नव्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच शेतकर्यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला द्यायला हवा कारण आता शेतकऱ्यांचे बर्यापैकी समाधान झाले आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
पवार यांनी शेतकरी कायद्याबाबत रविवारी रात्री एक ट्विट केले होते. त्या ट्विटबाबत चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायद्याची अंमलबजावणी दीड वर्ष थांबणार आहे. त्याकाळात चर्चा होऊ शकते. विश्वासात घेतलं जाऊ शकते. या पलिकडे केंद्र सरकारने काय करावं, हे मला कळत नाही. कृषी कायद्याबाबत पवारांचा हा आडमुठेपणा आहे,” अशी टीका भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
शिवसेनेने तर लोकसभेत पाठिंबा दिला आणि राज्यसभेत बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकताना मतदान का केले नाही? त्यामुळे हे सगळ निवडणुकीत विजयी न झाल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपला त्रास देण्यासाठी सुरू असल्याचे ते म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेनेने तर लोकसभेमध्ये पाठिंबा दिला, राज्यसभेत बहिष्कार टाकला. निवडणुकीत विजयी न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला त्रास देण्याचे काम सुरु आहे. पवार साहेबांना दीड वर्ष चर्चा करण्याची संधी आहे.”
आज सादर होणारा अर्थसंकल्प हा देशातील शेतकऱ्यांना सुखी आणि सुरक्षित करणारा असेल. शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे, ते गैरसमजुतीतून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांना सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातूनच शेतकर्यांना भरीव तरतूद मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच मध्यम वर्गाची अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असेल असे पाटील म्हणाले.