ओबीसी समाजासाठी छगन भुजबळांचे कार्य मोठे

9

ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाची मराठवाडा विभागीय बैठक लाडगाव (ता.औरंगाबाद) येथील छत्रपती लॉन्समध्ये पार पडली. कार्यक्रम सुरू असताना बालाजी शिंदे यांचे भाषण चालू होते. तेव्हा त्यांनी छगन भुजबळ यांच्याविषयी नकारात्मकता व्यक्त केल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्यांचे भाषण थांबवले. ओबीसी समाजासाठी छगन भुजबळांचे कार्य मोठे आहे असे म्हणत त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

कार्यक्रम स्थळावरील बॅनरवर छगन भुजबळ यांचे छायाचित्र देखील छापले नव्हते.यावरही कार्यक्रमात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे फक्त छायाचित्र छापण्यात येऊन त्यांचे नाव आणि पदाचा कोणताही उल्लेख त्यात करण्यात आला नव्हता. त्यामुळे सकाळपासूनच या कार्यक्रमाची उलट-सुलट चर्चा सुरू होती. हे सर्व मंत्री वडेट्टीवार यांच्या समोर घडले. शेवटी वडेट्टीवार यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत करताना भुजबळ यांचे समाजविषयीचे कार्य मोठे असल्याचे सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

या बैठकीचे आयोजन बाळासाहेब सानप यांनी केले होते. तसेच जालना महामार्गावर ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरवर बाळासाहेब सानप यांचा उल्लेख ओबीसी नेते म्हणून करण्यात आला होता. तर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.