जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग औरंगाबादने बर्ड फ्लू आजाराची भीती घालवण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे.
बुधवार, ३ रोजी पशुसंवर्धन विभागाने चिकन महोत्सव औरंगाबादेत आयोजित केला होता. बर्ड फ्लूची नागरिकांमध्ये भीती असल्याने नागरिक चिकन खत नाहीत. त्याचा मोठा फटका विक्रीवर होत आहे. त्यामुळे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचं कळतंय
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारी चिकन महोत्सव घेण्यात आला. या चिकन महोत्सवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांच्यासह अधिकाऱ्यांनी चक्क व्यासपीठावर बसून चिकन बिर्याणीचा आस्वाद घेतला. सोबतच चिकन खाण्याचे आवाहन केले.
बर्ड फ्लू आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू आढळला नाही. मात्र, बर्ड फ्ल्यूच्या अफवामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे चिकन विक्रेते, व्यावसायिक यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे.
भीती घालवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या डॉ. सुरेख माने यांनी चिकन महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती एल. जी. गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांनी चिकन बिर्याणी खाऊन बर्ड फ्लूची भीती न बाळगता चिकन खाण्याचे आवाहन केले आहे.