काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला, त्यासाठी प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील वाढता कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 वरील सर्व नागरिकांना लस देण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला होता.
त्या अनुषंगाने केंद्राने आता 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या 1 मे पासून सर्व 18 वर्षांवरील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. या निर्णयाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.