गेल्या वर्षभरापासून जग कोरोना नावाच्या विषाणूमुळे त्रस्त आहे. भारतातही कोरोनाचा मोठा प्रसार झाला होता. चीनच्या वुहान शहरातून कोरोनाची सुरुवात झाल्याच समोर आलं होतं. अनेक देशांनी, तज्ज्ञांनी, आरोग्य संघटनांनी, कोरोना चीन मध्ये सुरू झाल्याचा दावा केला होता, पुढे तो खराही ठरला. त्यामुळे जगभरातील लोकांचा चीनवर राग आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या व्हायरसला भाषणात चायनीज व्हायरस म्हणाले होते. मात्र चीनी संशोधकांनी अजब जावईशोध लावत हा विषाणूचा जन्म भारतात झाल्याचा दावा केला आहे. आणि कोरोनाचे खापर भारताच्या माथी फोडले आहे.
चीनच्या अकादमी ऑफ सायन्सेसमधील वैज्ञानिकांच्या एका गटाने सांगितले की, 2019 च्या उन्हाळ्यात कोरोना विषाणूचा भारतात जन्म झाला असावा. कोरोना विषाणू जनावरांमुळे दूषित झालेल्या पाण्याद्वारे मानवांमध्ये प्रवेश करतो. भारतात तसं झालं आणि त्यानंतर हा विषाणू चीनच्या वुहान शहरात पोहोचला. तिथेच या विषाणूची ओळख पटवण्यात संशोधकांना यश आलं. असं चीनी संशिधकांच म्हणणं आहे.
वुहानमध्ये सापडलेला कोरोना व्हायरस पहिला व्हायरस नव्हता. हा व्हायरस बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, रशिया किंवा सर्बिया यापैकी कुठल्यातरी देशात निर्माण झाला असावा. यापैकी भारत आणि बांगलादेश हे चीनच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे यापैकी एका देशातून कोरोना व्हायरसचा प्रसार होऊन तो व्हायरस वुहानपर्यंत पोहोचला असल्याची दाट शक्यता असल्याचं चीनी संशोधकांनी म्हटलं आहे.