गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झाले आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, अशी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. ते नाशिकमध्ये ‘टिव्ही 9 मराठी’शी बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 11 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते.
मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आले होते.आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळले होते. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. या प्रकरानंतर महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका झाली. याच टीकेला प्रत्युत्तर देताना भुजबळ यांनी हे वक्तव्य केले आहे.
राज्यपाल आणि सरकार यांच्यात विमानवारीवरून निर्माण झालेल्या संघर्षावर बोलताना भुजबळ म्हणाले की, राज्यपाल आणि सीएमओ यांनी एकमेकांचा मान-सन्मान राखायला हवा. मंत्रिमंडळाने जसा राज्यपालांचा मान ठेवायला हवा, तसाच राज्यपालांनीही मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा सन्मान करून कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रत्यत्रात मात्र तसे होत नाही. राज्यपालांची भूमिका लोकशाहीला घातक आहे.