संजय राठोड यांनी निर्लज्जपणे शक्तीप्रदर्शन केले त्या पोहरादेवीच्या महतांनाच आता कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याला उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांना कोरोनाचे नियम शिकवावे असा टोलाही भातखळकर यांनी लगावला.
कायम दातखिळी बसल्यासारखे गप्प बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याविषयी त्यांचे काय मत आहे याचा सुद्धा खुलासा करावा अशीही मागणी भातखळकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी संपूर्ण राज्याला उपदेशाचे डोस पाजल्याच्या दुसऱ्याच दिवशी वनमंत्री संजय राठोड यांनी दहा हजारांपेक्षा जास्त लोक जमवून कोरोनाला खुले निमंत्रण दिले. तर दुसरीकडे कोरोना योद्धयांचे लसीकरण अद्याप पूर्ण झाले नसताना, तसेच वरिष्ठ नागरिक, बालक यांना अगोदर लस देण्याची आवश्यकता असताना सुद्धा ठाण्यात शिवसेनेच्या नेत्यांनी स्वतःचे लसीकरण करून घेतले आहे.
हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे. यातून शिवसेनेची स्वार्थी मानसिकता दिसते, अशी घणाघाती टीकाही भातखळकर यांनी केली आहे.