मुख्यमंत्र्याची शेतकरी-प्रकल्पग्रस्तांशी चर्चा

11

चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला ताफा थांबवत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे गाडी थांबवून खाली उतरले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्याने पोलीस आणि प्रशासनाची कार्यक्रमस्थळी प्रचंड तारांबळ उडाली.

महाविकास आघाडी सरकारने कामाला आता गती देण्याचे निश्चित केले असून नागभीड तालुक्यातील घोडाझरी कालवा स्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे बाजूच्याच खुल्या मैदानावर हेलिकॉप्टरद्वारे पोहोचले.गेली अनेक वर्षे गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. राष्ट्रीय प्रकल्प घोषित झाल्यानंतरही यात कुठलाही विशेष बदल झालेला नाही. त्यामुळेच शेतीला पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेला हा दौरा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारा ठरला आहे.

कालवा स्थळाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणातून जे पाणी चंद्रपूरच्या वाट्याला येणार आहे त्यातील घोडाझरी कालव्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. विविध कंत्राटदारांनी थातूरमातूर कामं करून हा प्रकल्प थंडबस्त्यात टाकला होते.