जिल्हाधिकारी, एसपी, यांनी केली अचानक कोविड सेंटरची पाहणी…

16

परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काल रविवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक आयटीआय परिसरातील कोविड सेंटर व जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. रविवारी तब्बल 684 जण परभणीत कोरोना बाधित आढळले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जयंत मीना यांनी रविवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील आयटीआय परिसरातील कोविड सेंटर येथे जाऊन तेथील परिसराची पाहणी केली.

यावेळी त्यांनी रुग्णांशी चर्चा केली. त्याचबरोबर परिसरातील जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत जाऊन तिथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी या दोघांनी रुग्णांची वाढती संख्या पाहता दोन्ही सेंटरवर असलेल्या सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य अधिकार्‍यांना काही सूचना केल्या.