शरद पवार हे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार असून ते आपला ८० वा वाढदिवस साजरा करत आहेत.आज कोरोना नसता तर वाढदिवसाचा हा सोहळा मोठ्या जोमात साजरा करता आला असता. राज्यात त्यांचे अनेक नागरी सत्कार झाले असते, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असते, असे शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटले आहे.
पवार यांची साताऱ्यातील पावसातील सभेची आठवण सांगताना, पवार हे भरपावसातील सभेत विजेचा कडकडाट व्हावा तसे अवतरले. त्यांनी लहानसेच भाषण केले. त्याच भाषणाने आणि त्या पावसाळी छायाचित्राने महाराष्ट्रात विजेचा संचार झाला. त्याच सभेने पवार यांच्या नेतृत्वाचा कसदार कंगोरा पुन्हा समोर आणला८० वर्षांचे होऊनही पवारांचे वय वाढलेच नाही. असा त्यांचा उत्साह आजही दिसतो. आज ‘कोणत्याही सत्तेच्या पदावर नसलेला लोकप्रिय नेता’ असे वर्णन पवारांचे करायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत, अशा शब्दांनी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.