जागतिक कोरोना संकट तसेच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 9 डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी देशातील सर्व कॉंग्रेस प्रदेश शाखा प्रमुखाना वाढदिवस निमित्त केक न कापण्याचे अथवा कोणताही कार्यक्रम न करण्याचे आदेश दिले आहेत. कृषीसुधार विधेयकाविरुद्ध सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाला तसेच भारत बंदला कॉंग्रेसचा पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले आहे.
तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर मांडलेल्या शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. देशभरातून विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी यासाठी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रातील रक्त तुटवड्याची परिस्थिती पाहता प्रदेश काँग्रेसने यापूर्वीच केलेल्या आवाहनानुसार ‘जीवनदान महाभियान रक्तदान’ शिबीर मोठ्या प्रमाणात आयोजित करावे, असे आवाहन केले आहे. तसेच हा निर्णय घेण्यामागचं कारण देशातील विविध भागात महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे आपल्याला दु:ख होत आहे आणि त्यामुळेच त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, आज भारत बंदला काँग्रेसने पाठिंबा दिला असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, तेलंगाना राष्ट्रीय समिती, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, राष्ट्रीय लोक दल, डीएमके, समाजवादी पक्ष आणि पीएजीडी या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.