मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भावनिक राजकारण खेळते असा आरोप विरोधकांनी केला होता. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय.
नामांतर मुद्द्यावरुन राजकारणही चांगलंच तापलं आहे. इतकच काय तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधे शाब्दिक युद्ध पाहायला मिळतंय. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती.
यावर आता कॉंग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला, बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ मध्ये असलेल्या विषयांवर काम करण्यास कटिबद्ध आहोत.काँग्रेसला
‘सेक्युलरीजम’शिकवण्याची काहीच गरज नाही.आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यानंतर पुढे बोलता येईल.’ अस यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.