केंद्रातील तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता दोन महिने होऊन गेले आहेत. तरीही कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा पाहता सरकारने धास्ती घेतल्याचं सध्या चित्र आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण मिळाले.
या हिंसाचारावर सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
“निवडणुकीत जे पराभवी झाले आहेत ते देशभरात एकत्र येवून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. २६ जानेवारीला काँग्रेस अशाप्रकारे शेतकऱ्यांना भडकवू शकते, यावरुन काँग्रेस कोणत्या थरावर आली आहे, त्याचं हे उदाहरण आहे. काँग्रेसच्या भडकवण्याच्या या राजकारणाला लोक नक्की उत्तर देतील”, असं जावडेकर म्हणाले.
“पंजाबमध्ये त्यांचं सरकार असताना हा सर्व प्रकार घडला आहे. काँग्रेसच्या अशा राजनीतीचा आम्ही निषेध करतो. जनताच त्याला योग्य उत्तर देणार आहे. याआधी त्यांनी सीएए कायद्यावेळी असाच प्रयत्न केला होता”, असा आरोप त्यांनी केला.