एस. आय. शेख
देगलूर (जिल्हा नांदेड) : देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईत उपचारादरम्यान शुक्रवारी निधन झाले. त्यांची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले रावसाहेब अंतापूरकर (वय : 55) हे पेशाने अभियंता होते. अभियंता असताना देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकर मित्रमंडळाच्या वतीने समाजकार्यातून थेट राजकारणात प्रवेश केला होता. 2009 साली राजकारणात एन्ट्री मिळवत राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा ते आमदार झाले होते. 2009 व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळविला होता.
गेल्या काही दिवसांपासून ते कोरोना आजारामुळे मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. अत्यंत शांत व संयमी आमदार म्हणून त्यांची ओळख होती. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करीत माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना अशा शोकभावना व्यक्त केल्या.