परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश वरपुडकर तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवारी जिल्हा बँक सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
नवनिर्वाचित ज्येष्ठ संचालकांसह अन्य उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता अध्यक्ष – उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करावयास सुरवात झाली. त्यावेळी आमदार वरपुडकर व सौ. प्रेरणा वरपुडकर या दोघांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उपाध्यक्षपदासाठी औंढा नागनाथ सहकारी संस्था गटातील नवनिर्वाचित सदस्य गोरेगावकर यांनी अर्ज दाखल केला. अऩ्य कोणाचेही अर्ज आले नाहीत. छानणी प्रक्रियेतून हे अर्ज वैध ठरल्यानंतर सौ. प्रेरणा वरपुडकर यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदी आमदार वरपुडकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
त्यापाठोपाठ दुपारी एक वाजता उपाध्यक्षपदी गोरेगावकर यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली.क