‘मुस्लिम वोटबँकेवर परिणाम होईल म्हणून काँग्रेसचा नामांतराला विरोध’ राऊतांचा सामनातून काँग्रेसवर निशाणा, इथे वाचा सविस्तर…

64

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भावनिक राजकारण खेळते असा आरोप विरोधकांनी केला होता. आता त्याच मुद्द्याला नविन वळण मिळताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय.

नामांतर मुद्द्यावरुन राजकारणही चांगलंच तापलं आहे. इतकच काय तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधे शाब्दिक युद्ध पाहायला मिळतंय. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून काँग्रेसच्या निशाणा साधण्यात आला आहे. मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून केली आहे.

सामनातील संजय राऊत यांचे रोकठोक वाचा :

हिंदुस्थानची घटना ‘सेक्युलर’ आहेच. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला तर परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा, हिंदूंचा छळच केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात? औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली.

महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढय़ाचे नेतृत्व आधी छत्रपती शिवाजीराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यामुळे सच्च्या मर्‍हाटी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही. मराठवाडय़ातील सरकारी कागदोपत्री ‘औरंगाबाद’ नामे असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच.

आक्रमक मोगल औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे अजिबात नव्हता. तो मोगल शासक आणि आक्रमक होता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. औरंगजेबाच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजे छत्रपती संभाजी यांना मोगल सरदारांनी हाल हाल करून मारले व त्यांचा छिन्नविच्छिन्न देह पुण्याजवळच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत फेकून दिला. त्या प्रसंगाचे वर्णन असे करण्यात आले आहे. संभाजीराजांस जिवंतच धरून नेले! ‘शके 1610 च्या माघ व. 7 रोजी ‘संभाजीराजे व कवी कलशा खेळणाहून रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेख निजाम कोल्हापुरीहून दौड करून येऊन उभयतांस जिवंतच धरून नेले.’

शेख निजाम नावाचा एक कुतुबशाहीतील सरदार औरंगजेबास येऊन मिळाला होता. बादशहाने त्याला सहा हजारांची मनसब व मुकर्रब खान किताब देऊन त्याचा गौरव केला. त्याला कोल्हापूर प्रांताची माहिती चांगली असल्यामुळे पन्हाळा किल्ल्यास वेढा घालून संभाजीराजांना पकडण्याची कामगिरी बादशहाने याच्यावर सोपविली. औरंगजेबाने संभाजीराजांचा पाडाव करण्याचे फार प्रयत्न केले होते. सर्वत्र गुप्तहेर पसरलेले होते. त्यांनी येऊन शेख निजामास वर्दी दिली की, संभाजीराजे संगमेश्वर येथे आहेत. लागलीच मुकर्रब खानाने जय्यत तयार केली. दोन हजार स्वार व एक हजार पायदळ एवढय़ा सैन्यानिशी तो संभाजीराजांना पकडण्यास निघाला.

अंबाघाटात त्याच्या सैन्यास फारच त्रास सहन करावा लागला, परंतु नेटाने त्याने संगमेश्वर गाठून संभाजीराजांवर हल्ला केला. कवी कलशाने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हातास जखम झाल्यामुळे मागे फिरला आणि लोकही सर्व भराभर पळून गेले. खानाने संभाजीराजांच्या राहत्या घरास वेढा दिला. मराठय़ांचा पराक्रमी सिंह संभाजीराजे कवी कलशाबरोबर तळघराच्या काळोखात होते. शेख निजामाचा मुलगा इख्लास खान याने अरुंद पायऱयांवरून तळघरात प्रवेश केला आणि संभाजीराजे व कलशा यांना पकडून वर आणिले. मुकर्रब खान बाहेर होताच. त्याने त्या दोघांना हत्तीवर बांधले. घरात इतर माणसे सापडली त्यांना कैद केले व सर्वांना घेऊन तो बादशहाकडे निघाला. यासंबंधी असा उल्लेख सापडतो – ”मोगलाने कबजीसह हस्तगत करून नेले. ते समयी वाडा जाळिला व गावांतील देवळे फोडिली. देव बाटविले. याप्रमाणे महार्णव जालें!” याच वेळी गर्दीत म्हाळोजी घोरपडे ठार झाला आणि संताजी वगैरे त्याचे तिघे पुत्र रायगडाकडे गेले.

भोसले लढत राहिले औरंगजेब आणि भोसले घराण्याचा संघर्ष सतत सुरू राहिला. औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार असताना त्याने बागलाण जिंकले. शहाजी भोसल्यांचा पराभव केला. मोगलांविरुद्ध बंड करणाऱया खेलोजी भोसल्यास ठार केले. शहाजहान हा औरंगजेबाचा बाप. बापाने त्याला 1657 साली दक्षिणेत पाठवले. विजापूर, गोवळकोंड राज्यांवर स्वाऱया करून औरंगजेबाने हाहाकार माजवला. दौलताबादपासून जवळच खडकी येथे त्याने ‘औरंगाबाद’ शहर वसविले. औरंगजेब क्रूर आणि धूर्त होता. बादशाही मिळवण्यासाठी त्याने आजारी बापाला कैद केले. सख्ख्या भावांचा खून केला. औरंगजेब हा एक कर्मठ सुन्नी मुसलमान होता. तो परधर्मद्वेष्टा होताच, पण हिंदूंचा कडवट दुश्मन होता. अनेक तऱहेचे कर लावून त्याने हिंदूंचा भयंकर छळ केला. 1669 मध्ये त्याच्याच हुकमाने मथुरेतील केशवदेवाचे हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. मंदिर पाडून मशिदी बांधण्याचा त्याला छंदच जडला होता. त्याच्या हिंदूविरोधी आक्रमणामुळे हिंदू सैरभैर झाले व जाटांनी बंडे केली.

औरंगजेबाने ती निर्घृणपणे मोडून काढली. छत्रसाल बुंदेला व सतनामी यांनी औरंगजेबाच्या हिंदूविरोधी धोरणाविरुद्ध उठाव केला, पण सामर्थ्याच्या जोरावर औरंगजेबाने तो मोडून काढला. शिखांचे गुरू तेगबहादूर यांनीही औरंगजेबाच्या धोरणास विरोध केला. शीख गुरूंनी मुसलमान धर्म स्वीकारण्यास नकार दिला. म्हणून या शूर शीख गुरूंनाही ठार करण्यात आले. संतापलेल्या शिखांनी 1675 मध्ये औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारले. तेव्हा औरंगजेबाने जोधपूरचे राज्य खालसा करण्यासाठी अजितसिंग व त्याच्या राण्यांना कैद करून ठेवले. औरंगजेब हा परधर्मद्वेष्टा होता असे म्हणायचे ते याचसाठी. तो मर्‍हाटा, शीख, जाट, रजपूत सगळय़ांचा द्वेष करीत होता. त्याचे संबंध इराण, बुखारा, मक्का, बाल्ख या प्रांतांतील मुसलमान राजांशी होते. त्याला सर्व हिंदू राजांना खतम करून धर्माच्या आधारावर स्वतःची बादशाही निर्माण करायची होती, पण छत्रपती शिवाजीराजांसारखे मोजके योद्धे औरंगजेबाला स्वस्थता लाभू देत नव्हते.

इतिहास पुन्हा वाचा महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱयांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे. 1679 मध्ये त्याने जिझिया व इतर अनेक कर हिंदूंवर लादले. हिदूंचे उत्सव, धार्मिक क्रतवैकल्ये, पूजाअर्चा यावर निर्बंध आणले. औरंगजेब धर्मांध होता. त्याला हिंदुस्थानात फक्त इस्लाम धर्मच ठेवायचा होता. इस्लामचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्याने खास यंत्रणा उभी केलीच, पण धर्मांतरावर भर दिला. धर्मांधतेपायी त्याने हिंदूंची देवालये, शाळा, धार्मिक व्यवहार, शिकवण मोडून काढण्याचे अधिकार आपल्या अधिकाऱयांना दिले. पूजाअर्चा सांगणारा ब्राह्मण वर्ग त्यामुळे दहशतीखाली जगू लागला. मथुरा येथील केशवदेवाचे मंदिर, वाराणसीचे विश्वनाथाचे व बिंदुमाधवाचे मंदिर, गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर त्याने उद्ध्वस्त केले. याशिवाय तो जेव्हा स्वारीवर निघे तेव्हा वाटेत येणारी मंदिरे, शाळा तोडून पुढे जात असे. त्या प्रत्येक ठिकाणी तो मशिदी बांधत असे. कोणत्याही महत्त्वाच्या शासकीय पदावर हिंदूंना ठेवू नये असे फर्मान त्याने काढले. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी.

औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!