काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी देशातील काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधून, राज्यातील कोरोना स्थिती व लसीकरण मोहिमेचा आढावा धेऊन कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना केल्या.
काँग्रेस अध्यक्षांच्या समोर महाराष्ट्राची भूमिका मांडताना, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोरोना विरोधातील लढाई पूर्ण ताकदीने लढत आहे. देशात सर्वात जास्त कोरोना चाचण्या महाराष्ट्रात केल्या जात आहेत. लसीकरणाच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला हव्या तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
केंद्र सरकारने मागणीप्रमाणे महाराष्ट्राला पुरेसा लसीचा पुरवठा केला पाहिजे. राज्यात रेमडिसेवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. केंद्र सरकारने न्याय भावनेने रेमडिसेवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा तातडीने राज्याला केला पाहिजे या मागण्या महाराष्ट्राच्या वतीने आदरणीय सोनियाजी गांधी यांच्यासमोर मांडल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा झालेल्या या बैठकीस राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्र विधिमडंळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, झारखंडचे अर्थमंत्री व झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामेश्वर सोरेन यांच्यासह काँग्रेस अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.