निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या आणि शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष सत्तेत आले. त्यानंतर आता पुन्हा चित्र पालटू लागलं असून पक्ष सोडून गेलेले नेते पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारी असल्याचं दिसत आहे.
काँग्रेससोबतच राष्ट्रवादीतही ‘घरवापसी’चे संकेत दिले जात आहेत. ‘एकटे शिवेंद्रराजेच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक जण पक्ष प्रवेशासाठी प्रयत्नशील असून, त्यांना लवकरच प्रवेश देण्यात येईल,’ असं वक्तव्य करून नुकतंच राज्याचे अल्पसंख्यांक विभाग मंत्री नवाब मलिक यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील युवा नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मोहिते यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा केली.
माजी आमदार सेवक वाघाय आणि माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले गोपालदास अगरवाल हे देखील काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांचा काँग्रेस प्रवेश नेमका कधी होणार, याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालं नसलं तरीही ते लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होतील, अशी माहिती आहे.