राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने हाती घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला हातभार लावण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेजारच्या गोरगरिब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्या कुटुंबांच्या लसीकरणाचा खर्च उचलून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार वर्षभरापासून मोठ्या धैर्याने करत असून केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली असली तरी महाराष्ट्र सरकारने मात्र जनतेला वाऱ्यावर न सोडता १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे.
काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ५ लाख रुपये अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला केली आहे. लसीकरणाचा खर्च मोठा आहे त्याला हातभार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःच्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. अशी माहिती पटोले यांनी दिली.