राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा एक दोन नाही तर तब्बल चार वेळा स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे अजूनही राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ शकलेली नाही. परीक्षा उशिरा घेतली गेली तरी, ‘चालू घडामोडी’ या विषयाचा अभ्यासक्रमात बदल होणार नाही. मार्च २०२० पर्यंतचाच चालू घडामोडी अभ्यासक्रम असेल अशी माहिती आयोगाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. असे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले आहे.
राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम मोठा आणि अवांतर असला तरी आयोगाद्वारे अभ्यासक्रम निश्चित करून विद्यार्थ्यांना सांगितलं जातं. त्यामधे चालू घडामोडी हा दैनंदिन विषय असल्याने त्यात कायम बदल होत असतो. परीक्षेच्या तारखेनुसार एक निश्चित कालमर्यादा आयोग ठरवून देते.
यंदा लॉक डाऊन मुळे आणि अन्य कारणांनी आयोगाने चारदा परीक्षा पुढे ढकलली. त्यामुळे चालू घडामोडी विषयाचा अभ्यास कोणत्या काळातील करायचा याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कधी होणार ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही. पण चालू घडामोडी विषयाचा अभ्यास कोणत्या कालावधीतील करायचा याचा अंदाज आता विद्यार्थ्यांना येईल.