हिंजवडीत २७ नोव्हेंबर रोजी एका ठेकेदाराच्या हत्येचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. छट पुजेला जाऊ दिलं नाही या रागातून कामगाराने ठेकेदाराची हत्या केल्याचं उघड झालं आहे. अरविंद चौहान असं या आरोपीचं नाव असून हिंजवडी पोलिसांना त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. ठेकेदार व आरोपी कामगार हे हिंजवडीत एकाच खोलीत राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या २७ तारखेला हिंजवडी परिसरातील जांभे येथे गणपत सदाशिव सांगाळे या ठेकेदाराचा बंद खोलीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता त्याच्या सोबत राहात असलेल्या कामगाराने खून केला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल होत. मात्र, आरोपी अरविंद हा फरार झाला होता.
अधिक चौकशी केली असता अरविंदला छट पुजेसाठी गावाला जायचं होतं. परंतू ठेकेदार गणपत सांगळेने त्याला सुट्टी न दिल्यामुळे त्याच्या मनात राग होता. या रागातून अरविंदने ठेकेदार गणपत सांगळे याची हत्या करुन उत्तर प्रदेशला पळ काढला. याविषयी माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी एक पथक तयार करुन आरोपी अरविंदला उत्तर प्रदेशातील त्याच्या गावातून अटक केली आहे.