“ठाकरे सरकार वर्षपूर्ती सोहळा साजरा करत आहे. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला. हा त्यांचा पायगुण आहे” अशी प्रखर टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.
ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केलीय. या सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला. हा त्यांचा पायगुण. कोरोना आला आणि संपूर्ण राज्यात हाहाकार उडाला, असं नारायण राणे म्हणाले.
महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. असा आरोप नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलाय. कोरोनामुळे महाराष्ट्रात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला. इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना मृत्यूंची महाराष्ट्रातील संख्या जास्त आहे. इतर कशात नाही, पण कोरोना बळी आणि कोरोनाच्या वाढत्या संख्येत महाराष्ट्र नंबर वन झाला आहे, अशी टीकाही राणेंनी केली.