पुण्यात कोरोना रुग्णांची मोठी वाढ होत आहे. राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुण्यात घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र, सदरील निर्णय धुडकावून लावत बालगंधर्व रंगमंदिरात एक लावणीचा कार्यक्रम रंगला होता.
राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसेचे कसबा अध्यक्ष गणेश भोकरे यांनी केला आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तमाशा रंगला होता. रंगमंदिरात कमी लोकांची उपस्थिती असली तरी देखील अनेक लोक या कार्यक्रमाला हजर होते.
सदरील कार्यक्रमाची माहिती मिळाल्यावर मनसे नेत्यांनी हा कार्यक्रम बंद पाडला. कोरोना वाढत असताना असा कार्यक्रम घेतला जातोय. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा वाढदिवस इथे साजरा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आदेश त्यांनी धुडकावला आहे. असा आरोप करून कारवाईची मागणी मनसेचे कसबा अध्यक्ष गणेश भोकरे यांनी केली.