सध्या संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर राबवण्याचे आदेश केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत. मात्र सध्या केंद्राकडून राज्यांना अपुऱ्या प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होत आहे. तसेच राज्यात लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला आहे. मुंबईतही तशीच परिस्थिती आहे.
आज 18-44 वयोगटातील नागरिकांना केलं जाणारं लसीकरण तर नावालाच आहे. लसीच्या तुटवड्यामुळं वेगानं लसीकरण होत नसल्याची तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसंच लस उपलब्ध करून दिल्यास 24 तास 3 शिफ्टमध्ये काम करूनही लसीकरण करण्याची तयारी महापौर पेडणेकर यांनी दर्शवली आहे. त्या आज परिसर माध्यमांशी बोलताना लसीच्या मुद्द्यावर भाष्य करताना बोलत होत्या.
महापौर पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, संपूर्ण देशभरात ज्या पद्धतीनं लस पुरवठा होत आहे, तो अत्यंत कमी आहे. राज्याचा विचार करता महाराष्ट्र सरकारला लसींचा जो साठा दिला जातो, त्यापैकी सर्वाधिक साठा मुंबईसाठी मिळतो. मात्र मुंबईत आम्हाला उपलब्ध होणारा लसींचा साठाही अत्यंत कमी पडत आहे. आम्हाला जर सरकारनं मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिला तर आरोग्य कर्मचारी 24 तास 3 शिफ्टमध्ये काम करून लसीकरण मोहीम पूर्ण करतील, अशी तयारीही किशोरी पेडणेकर यांनी दाखवली आहे.