कोरोना रुग्णांची आर्थिक लूट थांबणार; तुमच्या शहराचा ‘हा’ असेल निश्चित दर

37

राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचारांसाठी येणाऱ्या अव्वाच्या सव्वा खर्चातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी सादर केलेल्या अधिसूचनेच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंजूरी दिली. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील.

कोरोना रुग्णांकडून अशाप्रकारे दर आकारले जाऊ शकतात,सामान्य वॉर्डमधील नियमित विलगीकरण ( प्रती दिवस) अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये. यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश. कोरोना चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधे यातून वगळली आहेत.