नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेवरही कोरोनाचे सावट आहे. येत्या २७ ते ३० एप्रिलदरम्यान परीक्षा घेण्याचे नियोजित असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाउन जाहीर झाल्यास अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एनटीए’तर्फे शैक्षणिक वर्षात दोनवेळा ही परीक्षा घेतली जात असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या चार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या परीक्षा पार पडल्या आहेत, तर एप्रिल व मेमध्ये उर्वरित दोन प्रयत्न विद्यार्थ्यांना देता येणार आहेत.
जेईई मेन्स परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असल्याने, परीक्षा स्थगित करण्यासंदर्भात राज्य शासनाला केंद्रीय मंत्रालय, एनटीए यांच्याकडे यासंदर्भातील भूमिका नोंदविणे आवश्यक आहे.
अद्याप परीक्षेचे प्रवेशपत्र ‘एनटीए’तर्फे उपलब्ध करून दिलेले नाही. त्यातच राज्य शासनाच्या भूमिकेकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.