देशातील चार बिगरभाजप राज्यांचा १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास नकार

24

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आला होता. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरण करून घेता येणार आहे. तसेच या लसीकरणासाठी २८ एप्रिलपासून ऑन-लाइन नोंदणीला सुरवात होणार आहे.


मात्र आता देशातील चार बिगरभाजप राज्यांनी या निर्णयाशी असहमती दर्शविली आहे. आमच्याकडे कोरोना लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरु करु शकत नाही, असे या राज्यांनी केंद्राला कळवले आहे. त्यामुळे या राज्यात अदयाप १८ वर्षावरील वयोगातील तरुणांना लगेच लस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.


या चार राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंडचा समावेश आहे. १ मेपासून १८ ते ४५ या वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार असल्याने बहुतांश राज्यांनी युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे. या लसीकरणासाठी २८ एप्रिलपासून नोंदणीला सुरुवात होईल. मात्र, चार बिगरभाजप राज्यांनी असमर्थता दर्शविल्याने केंद्र सरकारच्या देशव्यापी मोहिमेत अडथळे येण्याची शक्यता आहे.