भाजपचे माजी खासदार निलेश राणे नेहमीच कोणत्याही मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची सुवर्ण संधी सोडत नाहीत.मात्र यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्यावरच जोरदार टीकास्त्र सोडले आहे.पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते.
अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत; पण कसेतरी उपमुख्यमंत्रिपद मिळाले होते; पण आता दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. म्हणजे, अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’ असा टोला राणे यांनी लगावला होता.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचे नाव घेऊन त्यांना मोठे करायचे, असे म्हणत त्यांनी निलेश राणे यांचे नाव न घेता सणसणीत टोला लगावला. राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना समसमान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. असे म्हणत अजितदादांनी आपल्या शैलीत निलेश राणेंना चांगलाच टोला लगावला.
नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कुणीही नाराज नाही. त्यांनी जर अधिवेशन झाल्यानंतर राजीनामा दिला असता तर अधिक बरे झाले असते. त्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कर कमी केले तर पेट्रोलच्या दरात कपात करता येईल, असा सल्ला दिला होता, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले, की त्यांना सांगा आधी केंद्रातले कर कमी करा. मग, राज्य सरकार विचार करेल,’ असे प्रत्युत्तर पवार यांनी फडणवीस यांना दिले.