केंद्राच्या कृषी कायद्याना विरोध करत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज १६ वा दिवस आहे. कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाही. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे.
सिंघू बॉर्डर येथे आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं, तसंच महामारी कायद्यासहीत इतर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना पाहायला मिळतंय. शेतकरी संघटनांनी गुरुवारी एक बैठक घेतली होती. यामध्ये केंद्राकडून कृषी कायदे मागे न घेण्यात आल्यास देशभरात रेल्वे ट्रॅक रोखण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. १२ डिसेंबर रोजी दिल्लीला घेराव घालण्याचाही इशारा आंदोलकांनी दिलाय.
एकूणच येणाऱ्या काळात अधिक तीव्रतेने आंदोलन होईल असे चिन्हं आहेत.