राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून राज्यातील वादळ परिस्थितीवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. वादळ परिस्थिती, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा त्यांनी आढावा घेतला आहे.