महाविकासाआघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात येत होता.महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी सातत्यानं समोर येत आहे.मुंबई काँग्रेसचे महासचिव विश्वबंधू रॉय यांनी पक्षश्रेष्ठींकडे शिवसेनेविरोधात तक्रार केली आहे.
शिवसेना नेत्यांचे घोटाळ्यांमध्ये नाव येत असल्यानं त्याचा धोका कांग्रेसला असल्याची तक्रार विश्वबंधू रॉय यांनी केली आहे. सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल, अशी भीतीही रॉय यांनी पत्रात नमूद केली आहे. विश्वबंधू रॉय यांनी यापूर्वीही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबतची आघाडी पुढे चालून काँग्रेसला धोक्याची ठरु शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप रॉय यांनी केला होता.
नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र हे चित्र आभासी असल्याचं पुन्हा पुन्हा पाहायला मिळतं आहे.