भारतात कोरोना रोगाचा मोठा संसर्ग पसरला आहे. या कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमध्ये अनेक पालकांचं समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्या पालकांचे मुलांसाठी मोठे शैक्षणिक प्रश्न उभे राहिले आहेत.
आता काही चांगल्या बातम्या कानावर येऊ लागल्या आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. देशभरात खासगी शाळांच्या फीचा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. मात्र, छत्तीसगडमधील खासगी शाळांच्या संघटनेने आदर्श असा निर्णय घेतला आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोना संसर्गामुळे निधन झालं आहे, त्यांची फी माफ करण्याचा निर्णय छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटनं घेतला असल्याचं समजतंय. फी सोबतच विद्यार्थ्यांकडून स्कूल बस, गणवेशाची फी देखील घेतली जाणार नसल्याचं कळतंय.
या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. स्तुत्य उपक्रम असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. सोबतच छत्तीसगड प्रायवेट स्कूल मॅनेजमेंटनं मुख्यमंत्री बाघेल यांच्याकडे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं कोरोनानं निधन झालंय, अशा विद्यार्थ्यांचा समावेश आरटीईमध्ये करण्याची मागणी सुद्धा केली आहे.